गणपतीपुळे येथे निघालेल्या तीन तरुण अभियंत्यांच्या कारला पंढरपूर-पाटण राज्य महामार्गावरील वडोली भिकेश्वर येथे भीषण अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलट्या खात शेतात जाऊन कोसळली.
यामध्ये कारचालक ओंकार अनिल खंडागळे (वय २३, रा. पाटण, मूळ रा. बीड) या अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर व दुसरा किरकोळ जखमी झाला. हा अपघात रविवारी १४ जून रोजी पहाटे पावणे एकच्या सुमारास झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार खंडागळे, हरीश सुरेश वाघमारे (रा. पडळ, ता. खटाव) आणि प्रतीक रमेश धावणे (रा. चंद्रपूर) हे तिघेही एका खासगी बांधकाम कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. रविवारी १४ जून रोजी त्यांना सुट्टी होती. त्यामुळे त्यांनी गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी जाण्याचा निर्णय घेतला.
कोरेगावाहून शनिवारी रात्री ते गणपतीपुळे येथे जाण्यासाठी ओंकार याच्या कारने (एमएच. १४, डीए. ६६००) निघाले. वडोली भिकेश्वर, ता. कराड येथील कवठे फाटा येथे सर्वजण पोहोचल्यानंतर कारचालक ओंकार याचे वळणावर वेग अधिक असल्याने नियंत्रण सुटले. क्षणात कारने तीन-चार पलट्या घेतल्या. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या तीनशे फूट खोल शेतात जाऊन कोसळली.
यामध्ये ओंकार याचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे जखमी झाले. अपघाताचे वृत्त समजताच मसूर पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार सुधाकर भोसले, हवालदार बाळासाहेब कोळेकर यांनीही घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमींना रुग्णालयात हलविले. प्रतीक धावणे याच्यावर कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू असून, हरीश वाघमारे याला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघाताची मसूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, सहायक फौजदार सुधाकर भोसले हे पुढील तपास करीत आहेत.
सुट्टीचा आनंद क्षणात विरला
तिघा अभियंत्यांना एकाचवेळी सुट्टी मिळाल्याने तिघेही आनंदित होते. गणपतीपुळे येथे जाऊन पर्यटन करण्याचा त्यांचा बेत होता. मात्र, त्यांच्या कारला वाटेत अपघात झाला अन् काळाने एका मित्राला हिरावून घेतले. यामुळे सुट्टीचा आनंद त्यांचा क्षणात विरला.





