पावसाळा जितका आल्हाददायक असतो, तितक्याच समस्याही सोबत घेऊन येतो. या दिवसांत आजारांबरोबर कपडे धुणे आणि ते सुकवणे ही एक मोठी डोकेदुखी ठरते. हवेतील आर्द्रतेमुळे घरातील अनेक वस्तू खराब होऊ लागतात.
अशा वेळी ओले कपडे व्यवस्थित सुकवणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा सतत पडणारा पाऊस आणि उन्हाचा अभाव यामुळे २-२ दिवस कपडे पूर्णपणे सुकत नाहीत. परिणामी, कपड्यांना कुबट वास येऊ लागतो आणि त्यामध्ये ओलसरपणा राहतो, ज्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि त्वचेच्या ॲलर्जीचा धोका वाढू शकतो. जर तुमच्याही घरी पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नसतील, तर काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही ओले कपडे झटपट सुकवू शकता.
पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी सोप्या टिप्स (Tips To Dry Clothes During Monsoon)
अतिरिक्त पाणी व्यवस्थित पिळून घ्या: कपडे धुतल्यानंतर सर्वात आधी त्यांमधील अतिरिक्त पाणी पूर्णपणे काढून टाका. जर तुमच्याकडे वॉशिंग मशीन असेल, तर ‘स्पिन मोड’ (Dryer) नक्की वापरा.
सुक्या टॉवेलची मदत घ्या: जर एखादा कपडा जास्त ओला असेल, तर तो एका सुक्या आणि जाड टॉवेलमध्ये गुंडाळा. त्यानंतर हलक्या हाताने तो दाबा. टॉवेल कपड्यातील अतिरिक्त पाणी शोषून घेईल, ज्यामुळे कपडे हलके आणि कमी ओले होतील.
पंख्याखाली कपडे सुकवा: ऊन नसेल तेव्हा कपडे अशा खोलीत वाळत घाला जेथे हवा खेळती राहील. खोलीतील पंखा चालू ठेवा. हवेच्या सततच्या प्रवाहामुळे कपड्यांमधील ओलसरपणा वेगाने कमी होतो.

