Homeमहाराष्ट्रआकाश ठोसर-रिंकू राजगुरूची जोडी पुन्हा एकदा गाजणार? 'सैराट २'बाबत नागराज मंजुळे यांचा...

आकाश ठोसर-रिंकू राजगुरूची जोडी पुन्हा एकदा गाजणार? ‘सैराट २’बाबत नागराज मंजुळे यांचा खुलासा, म्हणाले.

२०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास निर्माण केला होता. दिग्दर्शक नागराज मुंजळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.

 

‘सैराट’ हा १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट होता. अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आर्ची आणि परशा यांच्या प्रेमकथेतून ग्रामीण वास्तव, जातीय विषमता आणि समाजातील कटू सत्य अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले होते. या सिनेमाचा हिंदीमध्ये ‘धडक’ हा रिमेकही करण्यात आला होता. आता या सिनेमाचा सीक्वेल ‘सैराट २’ येणार का, याबाबत नागराज मंजुळे यांनी मत मांडले आहे.

 

नागराज मंजुळे यांचा ‘फ्रेम’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमांच्या प्रमोशनप्रसंगी ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नागराज यांनी त्यांचे आगामी चित्रपट आणि प्रोजेक्ट यांबद्दल माहिती दिली. तसेच ‘सैराट’ या चित्रपटाचा दुसरा भाग येणार का, याबाबत स्पष्ट मत मांडले. हिंदीमधील धडक या चित्रपटाचा सीक्वेल आल्यानंतर ‘सैराट २’, असा सिनेमा करणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर नागराज म्हणाले, ” ‘सैराट’ची गोष्ट लिहीत असताना माझ्या मनात विचार होता की, चित्रपटांमध्ये जसं प्रेमाचं जग दाखवलं जातं, ते वास्तवापेक्षा खूप वेगळं असतं. खऱ्या आयुष्यात प्रेमात असताना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागतो. मला यामध्ये गरज नसताना नाट्यमयता आणण्याची गरज वाटली नाही आणि म्हणून मी आहे तसं वास्तव दाखवणारी गोष्ट ठेवली.”

 

समाजातील वास्तव मांडणं हाच दृष्टिकोन

 

पुढे ते म्हणाले, “मी या सिनेमाकडे कधीच एक आव्हान म्हणून पाहिलं नाही. या चित्रपटातून मला जे सांगायचं होतं, ते मी मांडलं. सहसा आपल्याला असं वाटतं असतं की, सगळ्या लव्ह स्टोरीचा शेवट हा ‘हॅपी एंडिंग’नं होतो; पण तसं नसतं. त्यातील खऱ्या समस्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे जे वास्तव आहे, ते मांडणं हाच माझा दृष्टिकोन होता.”

 

सैराट या सिनेमाचा करण जोहरने रिमेक केला होता. त्याबाबत नागराज म्हणाले, “सैराट या सिनेमाचा कधी बॉलीवूडमध्ये रिमेक होईल, असा मी विचारही केला नव्हता. मी फक्त माझा चित्रपट प्रामाणिकपणे बनवला. तो लोकांना किती आवडेल किंवा त्याचा रिमेक होईल का, याचा मी कधीच विचार केला नव्हता.”

 

‘धडक २’ नंतर ‘सैराट २’ बनवण्याचा विचार आहे का, या प्रश्नावर नागराज म्हणाले, “‘धडक’ सिनेमाचा सीक्वेल आलाय म्हणून ‘सैराट २’ आलाच पाहिजे, असं काही नाही. पण, जर चांगली गोष्ट असेल, तरच ‘सैराट २’ येईल. ‘सैराट’मध्येच ती गोष्ट पूर्णपणे संपली होती; पण एखादा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आणि हिट झाला की, त्या पात्रांचं पुढे काय झालं, हे जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता असते. आजही ‘फँड्री’च्या सीक्वेलबद्दलही अनेक जण मला विचारतात. पण जसा ‘सैराट’ प्रदर्शित झाल्यानंतर लोक त्याबाबत विसरले होते. आता पुन्हा अनेक जण ‘सैराट २’ कधी येणार, असा प्रश्न विचारत आहेत. पण सध्या तरी त्यावर कोणताही विचार केलेला नाही.”

 

नागराज यांच्या ‘खाशाबा’ चित्रपटाचा टीझर रिलीज

 

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुप्रतीक्षित ‘खाशाबा’ सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सिनेमा दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित आहे. १९५२ च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कास्यपदक पटकावलं होतं. स्वतंत्र भारतामध्ये वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे पहिले भारतीय कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जीवनप्रवास या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र, खाशाबा ही भूमिका कोण साकारणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आल्यानं उत्सुकता निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -