देशात बरेच सायबर गुन्हे होत असतात. आता अशाच एका सायबर हल्ल्यात देशातील मोठी बँक बळी पडली आहे.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, एका हॅकरने बँकेचा सुमारे १ टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर विनामूल्य लीक केल्याचा दावा केला आहे. हॅकरचा दावा आहे की, त्याने बँकेच्या सर्व्हर्समधून सुमारे १ टीबी डेटा चोरून तो ऑनलाइन अपलोड केला आहे, जिथे कोणीही तो डाउनलोड करून त्याचे विश्लेषण करू शकतो. या कथित डेटा डंपमध्ये ग्राहकांची नोंद, बँकिंग माहिती, अंतर्गत कागदपत्रे, ऑडिट अहवाल आणि अनुपालन नोंदी यांचा समावेश आहे. नेमकी कोणती आहे
बँक ऑफ बडोदा ही बँक एका मोठ्या सायबर हल्ल्याची बळी ठरली आहे. हॅकरने बँकेचा सुमारे 1 टीबी डेटा डार्क वेबवर लीक केला असल्याचा दावा केला जात आहे. पण या दाव्यावर बँक ऑफ बडोदा, भारतीय रिझर्व्ह बँक किंवा कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. जर हा डेटा खरा असेल, तर त्यामुळे ग्राहकांना फिशिंग हल्ले, ओळख चोरी आणि आर्थिक फसवणुकीचा धोका निर्माण होऊ शकतो.
लीक झालेल्या डेटामध्ये कशाचा समावेश?
डार्क वेबवर पोस्ट केलेल्या लिंक्सनुसार, या १ टीबी डेटामध्ये देशभरातील विविध बँक शाखांमधील विस्तृत माहितीचा समावेश आहे.
ग्राहकांची नावे, मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक यांसारखे वैयक्तिक तपशील.
बचत आणि चालू खात्याचा तपशील, नेटबँकिंग वापरकर्त्याची माहिती.
ग्राहकांची कर्ज कागदपत्रे, एनआरआय बँकिंग रेकॉर्ड आणि कॉर्पोरेट बँकिंग फाइल्स.
बँकेचे अंतर्गत ऑडिट, शाखा दक्षता तपासणी आणि बँक ॲप्समधील ऑडिट अहवाल.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जर तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल, तर डाउनलोडसाठी उपलब्ध असलेल्या १ टीबी डेटामध्ये वर नमूद केलेली खात्याची माहिती असू शकते आणि ही माहिती तुमच्या ओळखीशी आणि नावाशी जोडलेली असू शकते.
तात्काळ करा ‘हे’ काम
तुमचा इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग लॉगिन आयडी आणि पासवर्ड ताबडतोब बदला.
हॅकर्सनी तुमचा आधार क्रमांक लीक केल्याचा दावा केल्यामुळे, अधिकृत UIDAI वेबसाइट किंवा mAadhaar ॲपला भेट देऊन तुमचे आधार बायोमेट्रिक्स लॉक करा. यामुळे तुमच्या आधारचा गैरवापर होण्यापासून बचाव होईल.
कोणत्याही संशयास्पद कॉल, एसएमएस किंवा ईमेलवर विश्वास ठेवू नका, ज्यामध्ये कॉलर बँकेचा कर्मचारी असल्याचा दावा करत असेल.
कोणतीही संशयास्पद हालचाल ओळखण्यासाठी तुमचे बँक खाते स्टेटमेंट नियमितपणे तपासा.



