Homeमहाराष्ट्रमहिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी; NCMC स्मार्ट कार्डची अंतिम मुदत वाढली

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी; NCMC स्मार्ट कार्डची अंतिम मुदत वाढली

एसटी प्रवासादरम्यान (ST Bus News)शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप स्मार्ट कार्ड प्रत्यक्षात प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एमएसआरटीसी) अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्य शासनाकडून अमृत ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात मोफत प्रवासाची सुविधा, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते. या सवलती अधिक पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी १ ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय यापूर्वी जाहीर करण्यात आला होता.

 

मात्र, राज्यभरातील लाखो पात्र प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असली, तरी अनेकांना अद्याप कार्ड मिळालेले नाही. अशा परिस्थितीत केवळ कार्ड उपलब्ध नसल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या सवलतींपासून वंचित राहावे लागू नये, याची दखल परिवहन विभागाने घेतली आहे.

 

याबाबत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईकम्हणाले, “एसटीची प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे. तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणांमुळे कोणत्याही पात्र ज्येष्ठ नागरिक अथवा महिला प्रवाशाची गैरसोय होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे. त्यामुळे NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

 

या निर्णयामुळे अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्यांनी स्मार्ट कार्डसाठी अर्ज केला आहे, पण अद्याप कार्ड मिळालेले नाही, त्यांनाही या वाढीव मुदतीदरम्यान पूर्वीप्रमाणेच शासनाच्या सवलतींचा लाभ घेता येणार आहे.

 

दरम्यान, परिवहन विभागाने पात्र प्रवाशांना वाढीव मुदतीचा लाभ घेत NCMC स्मार्ट कार्डची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. १ सप्टेंबरनंतर स्मार्ट कार्डची अनिवार्यता लागू होण्याची शक्यता असल्याने, लाभार्थ्यांनी वेळेत कार्ड मिळवून भविष्यातील गैरसोय टाळावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

राज्यभरात एसटी सेवेद्वारे दररोज लाखो महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. त्यामुळे मुदतवाढीच्या या निर्णयामुळे विशेषतः ग्रामीण भागातील आणि अद्याप कार्ड न मिळालेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -