कानाला पिस्तुल लावणे, शिवीगाळ करणे अशा आरोपांमुळे पोलीस निरीक्षकाची अखेर बदली …इंटरेरियर डेकोरेटनला मारहाण करुन कानाला पिस्तुल लावणे, वाहनचालकाला शिवीगाळ करणे अशा आरोपामुळे वादग्रस्त ठरलेल्या पोलीस निरीक्षकाची अखेर बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांची वाहतूक शाखेतून विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. घराचे इंटेरियर डेकोरेशनचे काम व्यवस्थित झाले नाही म्हणून राजेश पुराणिक यांनी इंटेरियर डेकोरेटरला कार्यालयात बोलावून तेथे त्याला मारहाण केली व त्याच्या कानाला पिस्तुल लावले होते. तसेच दिलेले पैसे परत मागितले होते.

याप्रकरणी राजेश पुराणिक यांच्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाची चौकशी करण्यात येत असून तपासात जे निष्पन्न होईल, त्यानुसार पुढे कारवाई होईल, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर अद्याप कोणती कारवाई करण्यात आल्याचे आढळून आलेले नाही.

या प्रकरणानंतर आणखी एक तक्रारदार विश्वास जाधव (वय ४८, रा. भवानी पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन राजेश पुराणिक यांच्यावर ३२३, ५०४, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचा मुलगा तन्मय हा नाना पेठेत सामान आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याची अॅक्टिव्हा दुचाकी वाहतूक पोलिसांनी उचलून नेली. तक्रारदार हे समर्थ वाहतूक विभागात गाडी सोडवण्यासाठी गेले होते.

त्यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांना विनाकारण गाडी उचलून आणल्याबाबत विचारणा करुन मदत करण्याची विनंती केली. त्यावेळी वाहतूक पोलीस कर्मचार्याने तन्मयने शिवी दिल्याची खोटी माहिती पुराणिक यांना दिली. याचा राग आल्याने पुराणिक यांनी मुलगा तन्मय आणि तक्रारदार यांना शिवीगाळ करुन दमदाटी करत मारहाण केली. तसेच मुलाच्या मोबाईलच्या स्क्रिनचे नुकसान करुन खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. एका पाठोपाठ दोन गुन्हे दाखल झाल्याने शेवटी शहर पोलीस प्रशासनाने राजेश पुराणिक यांची वाहतूक शाखेतून विशेष शाखेत बदली केली आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group