इचलकरंजी/प्रतिनिधी –
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक सेल या विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी इचलकरंजी येथील डॉ. संजय धुळाप्पा चौगुले यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या आदेशानुसार सांस्कृतिक सेल विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ. विद्या कदम यांनी श्री. चौगुले यांची निवड केली आहे.
शहरातील चौगुले बोअरवेल्सचे मालक उद्योगपती डॉ. संजय चौगुले हे मागील 40 वर्षापासून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे कट्टर कार्यकर्ते होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते राजकारणात सक्रीय होते. यापूर्वी त्यांनी वचनपूर्ती अभियानात सांगली शहर आणि सामाजिक समता वर्षात सांगलवाडी पक्ष निरिक्षक त्याचबरोबर पर्यटन सेलचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला होता. एनएसयुआय च्य माध्यमातून ते शालेय जीवनापासून काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. पक्ष संघटन बळकटीसह सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक विभाग प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. चौगुले यांची निवड करण्यात आली आहे. याकामी त्यांना राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. श्री. चौगुले यांच्या निवडीने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.