ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : एका साखर कारखान्याच्या सत्तेसाठी माजी मंत्री सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा गट परस्परांना चॅलेंज देवून चक्क बिंदू चौकात आले. शड्डू ठोकून एकमेकांना आव्हान दिले..कोण भ्याले म्हणाले तर कोण पळाले म्हणाले.. परंतू यातून कोल्हापूरचा नांवलौकिक धुळीला मिळाला… नेत्यांनो, तुम्हांला चॅलेंजच द्यायचे असेल तर कोल्हापूरच्या प्रश्नांना द्या.. तिथे तुमची ताकद दाखवा..त्यातून तुमच्यासह जनतेचेही भले होईल…!
कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २३ एप्रिलला होत आहे. त्याचा प्रचार करण्यासाठी अजून तब्बल आठवडा हातात आहे. गेल्या पंधरवड्यापासून दोन्ही गटाकडून सभा,प्रचार मेळावे सुरु आहेत. त्यात सुरु असलेल्या आरोप- प्रत्यारोपातून कोल्हापूरच्या जनतेची करमणूक होत आहे. निवडणूक एका कारखान्याची असो की लोकसभेची. तिथे प्रचाराची पातळी किती खालीपर्यंत न्यायची याचे भान ती लढवणाऱ्यांनीच बाळगले पाहिजे. परंतू शुक्रवारी तसे घडले नाही. नेतेच बिंदू चौकात येवून एकमेकांची गळपट्टी धरायची भाषा करू लागल्यावर त्याचे लोण गावपातळीवर पोहोचायला वेळ लागत नाही. त्यातून गावोगावी तणाव निर्माण होणार आहे. सहकारी साखर कारखानदारीपुढे आज अनेक अडचणी आहेत. एकाबाजूला केंद्र सरकार एफआरपी वाढवत आहे आणि साखरेची किमान विक्री किंमतही वाढवायला तयार नाही. दोन्ही गट आता निवडणूकीवरच एवढी पैशाची उधळण करू लागल्यावर त्यातून कारखान्याचा कारभार किती पारदर्शक होणार याची भिती सभासदांच्या मनांत आताच तयार होवू लागली आहे.
सतेज पाटील असोत की महाडिक गट, जिल्ह्याच्या राजकारणात तुमची दोघांचीही स्वतंत्र राजकीय ताकद आहे. ही ताकद एकवटली असती तर त्यातून जिल्ह्याला अजून चांगले वळण लागले असते परंतू ती शक्यता सध्यातरी दिसत नाही. राजकारणात विरोधक असला तरी तुम्ही एकमेकांचे वैरी नाही. शुक्रवारचा व्यवहार तसाच होता. माजी मंत्री पाटील यांचे कोल्हापूरच नव्हे तर राज्याच्या राजकारणात स्वतंत्र स्थान तयार होत आहे. पक्षही त्यांच्याकडे आशेने पाहत आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे राजकारण जिल्ह्यापुरते मर्यादित होते. परंतू खासदार धनंजय महाडिक यांना भाजपने चांगली संधी दिली आहे. त्यांनाही भविष्यात चांगल्या संधी आहेत. असे असताना तुम्ही दोघेही वैरत्वाच्या बेड्या पायात घालून स्वत:चे राजकीय भवितव्य एका कारखान्यापुरते, जिल्ह्यापुरते मर्यादित करू नका.