ताजी बातमी/ऑनलाइन टीम इचलकरंजी/प्रतिनिधी –
इजिप्त येथे होणार्या वर्ल्ड किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झालेल्या देशातील बारा खेळाडूंमध्ये इचलकरंजीच्या आदित्य आनंदराव उबाळे याची निवड झाली आहे. ऑक्टोबरमध्ये होणार्या जागतिक स्पर्धेसाठी आदित्य भारतीय किक बॉक्सिंग महासंघाचेवतीने इजिप्तला जात आहे. त्याचा सत्कार करून त्याला आर्थिक मदतीचा धनादेश महाराष्ट्र कोष्टी समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते, विश्वस्त उत्तम म्हेत्रे तसेच मंडळाचे सल्लागार विठ्ठलराव डाके, देवांग समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे यांचे हस्ते देण्यात आला.
इचलकरंजीतील देवांग मंदिरामध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना आदित्य उबाळे याने, या स्पर्धेच्या माध्यमातून देशाचे तसेच वस्त्रनगरीचे नाव जगभर होईल असा प्रयत्न करु असे अभिवचन दिले. यावेळी शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र कोष्टी समाजाचे महासचिव रामचंद्र निमणकर यांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते झाला. तसेच रामलिंग सहकारी पत संस्थेचे चेअरमन विजयराव मुसळे यांचा 50 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाशराव सातपुते यांनी, राज्यात मंडळाच्या माध्यमातून विविध प्रकारचे सहाय्य करीत असून अनेक नवनवीन योजना राबवित असल्याचे सांगितले. विठ्ठलराव डाके यांनी, राज्य कोष्टी समाजाच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तर विश्वनाथ मुसळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सौ. प्राजक्ता होगाडे, सौ. सुधा ढवळे, शितल सातपुते, मिलींद कांबळे, अमोल डाके, पंढरीनाथ ठाणेकर, दिलीप भंडारे, संजय सातपुते यांचेसह अनेक सदस्य ऑनलाईन व ऑफलाईन हजर होते. झूमच्या माध्यमातून झालेल्या या कार्यकमास प्रकाशशेठ कांबळे, अरविद तापोळे, अंकुशराव उकार्डे, विश्वनाथ पोयेकर, गुरूनाथ तिरपणकर, सुरेशराव म्हेत्रे, सुर्यकांत लोले यांचेसह सदस्य सहभागी झाले होते.