इचलकरंजीत कौटुंबिक वादातून पत्नीने झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्ता घालून खून केल्याची गंभीर घटना आज पहाटे इचलकरंजीतील गावभाग परिसरात घडली. सागर दीपक बुरसे (वय ३५, रा.त्रिशूल चौक, गावभाग) असे मृताचे नाव आहे. खून केल्यानंतर पत्नी वैशाली हिने सकाळी स्वतः पोलिस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. सागर हे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कर्मचारी होते.
सागर आणि वैशाली यांच्यात कौटुंबिक कारणातून वारंवार वाद होत होते. काही वर्षांपूर्वी दोघे विभक्तही झाले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते पुन्हा एकत्र राहत होते. आज पहाटे चारच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर दोघे झोपी गेले. झोपेत असलेल्या सागर यांच्या डोक्यात वैशाली हिने वरवंटा घातल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर वैशाली झोपी गेली. सकाळी उठल्यानंतर तिने नेहमीचा दिनक्रम आटोपला आणि मुलीला सोबत घेऊन थेट पोलिस ठाणे गाठले. तेथे पतीचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराची पाहणी करून घटनेची खातरजमा केली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
