केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक युनिटने (एसीबी) केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे सहआयुक्त व चार्टर्ड अकाउंटंट यांना चार लाख रुपयांची लाच घेताना अटक केली. यवतमाळचे जयंत चौपाणे या कंत्राटदाराला चार लाखांची लाच मागितली होती. सीजीएसटीचे सहआयुक्त मुकुल पाटील आणि सीए हेमंत राजंडेकर असं अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत. सेवा कर दायित्वाशी संबंधित प्रकरणात लाच मागितली होती. कंत्राटदाराला सेवा कर दायित्वाशी संबंधित कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मुकुल पाटील यांनी हेमंत राजंडेकर यांच्या माध्यमातून लाचेची मागणी केली होती. आरोपी पाटील यांना दोन महिन्यांपूर्वीच पदोन्नती मिळाली होती. त्यांच्याकडे सीजीएसटीमध्ये कस्टम विभागात जबाबदारी सोपविण्यात आली होती.
यवतमाळ येथील जय इलेक्ट्रिल्सचे ठेकेदार जयंत चौपाणे यांचे प्रकरण पाटील यांच्याकडे सुनावणीसाठी होते. या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी सीए हेमंत राजंदेकर यांच्या माध्यमातून चार लाख रुपये देण्याचे निश्चित झाले. ठेकेदार जयंत चौपाणे गुरुवारी सायंकाळी अजनी चौकातील सीएच्या कार्यालयात पोहोचला. सीएने चार लाख रुपये लाच घेतली. तसेच याची माहिती मुकुल पाटील याला दिली. यानंतर सीबीआयच्या पथकाने राजंदेकरला ताब्यात घेतले.