सलमान खान आणि कतरिना कैफ याच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटाची चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. अखेर निर्मात्यांनी आज या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये सलमान खान पूर्ण स्वॅग आणि जोशात दिसत आहे. दुसरीकडे कतरिना कैफ देखील आपल्या अॅक्शनच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. टीझरसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. ‘टायगर 3’च्या टीझरमध्ये कतरीनाची अॅक्शन आणि सलमानच्या स्वॅगची झलक पाहायला मिळते. कतरिना कैफ ब्लॅक आउटफिटमध्ये फायटिंग स्टंट करताना दिसत आहे.
सलमान खानने आपल्या ट्विटर हॅडलवरून ‘टायगर 3’ चित्रपटाचा पहिला टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करताना कॅप्शनमध्ये सलमानने लिहिले “आपण सर्वांनी स्वतःची काळजी घेऊया. 2023 च्या ईदला टायगर 3 हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये रिलीज होत आहे. 21 एप्रिल 2023 रोजी पहा तुमच्या जवळच्या मोठ्या स्क्रीनवर”. दरम्यान, यशराज फिल्म्सने नुकतीच शाहरुख खानच्या पठाणच्या रिलीजची तारीख जाहीर केली होती आणि तेव्हापासून चाहते ‘टायगर 3’ च्या रिलीजच्या तारखेची आतुरतेने मागणी करत होते.
सध्या सलमान खान आणि कतरिना कैफ टायगर 3 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. काही आठवड्यांपूर्वी सलमान खान आणि कतरिना कैफची झलक चित्रपटाच्या सेटवरून शेअर करण्यात आली होती. यात ते हाय-ऑक्टेन अॅक्शन स्टंट करताना दिसले होते. अॅक्शन किंवा फाईट सीननंतर दोघेही जखमी आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. टायगर 3 च्या आधी सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटात पूजा हेगडे आणि सलमान खान मुख्य भूमिकेत आहेत.