Tuesday, May 13, 2025
Homeकोल्हापूरभरवस्तीत आणि निवासी संकुलात घरफोडी; परिसरात भीतीचे सावट

भरवस्तीत आणि निवासी संकुलात घरफोडी; परिसरात भीतीचे सावट

नागाळा पार्क परिसरात हरीपूजापूरम सोसायटीतील सदानंद कमलचंद गुप्ता यांचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दहा तोळे दागिन्यांसह दीड लाखांची रोकड असा पाच लाख 65 हजारांचा ऐवज लंपास केला. मंगळवार, दि. 20 ते रविवार, दि. 25 या दरम्यान ही घटना घडली. रविवारी रात्री उशिरा हा प्रकार उघडकीला आला. भरवस्तीत आणि निवासी संकुलात तिसर्‍या मजल्यावर घरफोडी झाल्याने परिसरात भीतीचे सावट आहे.


याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. मुलीच्या लग्नासाठी फिर्यादी गुप्ता कुटुंबीय लोणावळा येथे गेले होते. फ्लॅटमध्ये कोणीही सदस्य नसल्याची संधी साधून चोरट्यांनी प्रवेशद्वाराचा कडी- कोयंडा उचकटून प्रवेश केला व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखाच्या रकमेवर डल्ला मारला. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक महादेव वाघमोडे, उपनिरीक्षक सुनीता शेळके आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथकांसह ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. बंद फ्लॅटची रेकी करून परिसराची माहिती असलेल्या सराईत टोळीने घरफोडी केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.

चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून दीड तोळ्याच्या दोन सोनसाखळ्या, दीड तोळ्याचे मणी मंगळसूत्र, दोन तोळ्याच्या कानातील पाच रिंगांचा जोड, दीड तोळ्याच्या दोन अंगठ्या, सोन्याचे पॉलिश असलेले घड्याळ, 10 हजार रुपये किमतीचा चांदीचा कमरपट्टा, 20 ग्रॅम वजनाची सोन्याची दोन नाणी तसेच दीड लाखाची रोकड असा पिाच लाख 65 हजारांचा ऐवज लांबविला.

मुलीचा लग्नसोहळा आटोपून सदानंद गुप्ता हे कुटुंबासमवेत रविवारी रात्री कोल्हापूरला परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. शाहूपुरी पोलिस ठाण्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. शहर, परिसरात गेल्या काही दिवसांत घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांत भीती आणि चिंतेचे सावट आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -