इचलकरंजी ; पूरग्रस्त यंत्रमागधारकांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यश

इचलकरंजी/प्रतिनिधी –
पूरग्रस्त यंत्रमागधारकांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यासाठी इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशनच्यावतीने सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झाली असून येत्या सोमवारपासून ती प्रत्येकाच्या बँक खात्यावर जमा केली जाणार असल्याची ग्वाही गुरुवारी अप्पर तहसिलदार शरद पाटील यांनी शिष्टमंडळाला दिली.
जुलै महिन्याच्या अखेरीस शहरात उद्भवलेल्या महापूरामुळे इचलकरंजी गावभागासह ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांना स्थलांतरीत व्हावे लागले. त्याचबरोबर यंत्रमागासह विविध उद्योग, व्यवसाय, शेती यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य शासनाने सर्वच पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. परंतु दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी यंत्रमागधारकांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने या संदर्भात इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशनच्यावतीने पाठपुरावा सुरु होता. आधीच संकटात सापडलेला यंत्रमाग व्यवसाय महापूरामुळे मोडकळीस आला आहे. नुकसान भरपाई मिळत नसल्याने व्यवसाय सुरु करण्यात अडचणी येत होत्या.
या प्रश्‍नी इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशनचे अध्यक्ष सतिश कोष्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अप्पर तहसिलदार शरद पाटील यांची भेट घेत अडचणी मांडल्या. त्यावर श्री. पाटील यांनी शासनाकडून अनुदान प्राप्त झाले असून त्याची घरगुती आणि व्यावसायि अशी वर्गवारी करण्याचे काम सुरु आहे. येत्या सोमवारपासून प्रत्येकाच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. त्यामुळे सर्वांनाच नुकसान भरपाई मिळणा असून या प्रश्‍नी पॉवरलूम असोशिएशनने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
शिष्टमंडळात संचालक चंद्रकांत पाटील, रफिक खानापुरे, पांडुरंग सोलगे, कारखानदार रावसाहेब तिप्पे, सुरेश तोडकर, संदीप पाटील आदीसंह यंत्रमागधारकांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *