Friday, March 29, 2024
Homeब्रेकिंगमुख्यमंत्री शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या घराच्या मुद्द्यालाच हात घातला, पहा...

मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या घराच्या मुद्द्यालाच हात घातला, पहा नेमकं काय म्हणाले

ताजी बातमी ऑनलाईन टीम

समृध्दी महामार्गावर बुलढाणा येथील अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याने संवेदनशील असल्याने भाजपने मोर्चा रद्द केला. मात्र, कोणतीही संवेदना न उरलेल्या आणि केवळ राजकारण करणाऱ्यांनी मोर्चा काढला. कोविड सेंटरच्या नावाखाली करण्यात आलेल्या गैरव्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरु झाल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे जनतेची दिशाभूल करण्यासाठी मोर्चा काढला जात आहे. मात्र, जनता या भूलथापांना फसणार नाही. आजचा मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षात युवासेनेच्या कोअर कमिटीचे राहुल कनाल आणि वर्धा जिल्ह्यातील करंजा नगरपरिषदेतील 10 नगरसेवकांनी पक्ष प्रवेश केला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. महापालिकेत झालेल्या गैरव्यवहारांबाबत ईडी चौकशी करत आहे. ही चौकशी आम्ही लावली नाही. मात्र, चौकशी सुरु झाल्याने घाबरलेल्या विरोधकांनी आमच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईत सिमेंट क्रॉंकिटचे रस्ते 20 वर्षापूर्वी करायची गरज होती. तसे केले असते तर महापालिकेचे साडेतीन हजार कोटी रुपये वाचले असते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. युती सरकार राज्यात आल्यावर आम्ही विकासकामांचा धडाका लावला. त्यामुळे विरोधकांना पोटदुखी झाली आहे. ती पोटदुखी पळवण्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

मृतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांनी…
कोविड सेंटर लोकांना जगवण्यासाठी बनवली होती की मारण्यासाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे. बोगस कोविड सेंटर, बोगस डॉक्टर, बोगस ऑक्सिजन प्लँट उभारण्यात आले. सदोष ऑक्सिजन प्रकल्पामुळे रुग्णांना ब्लॅक फंगस आजार झाला. मृतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांनी कोविड काळातील मृत व्यक्तींचे मृतदेह नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉडी बॅगसाठी सहाशे रुपयांऐवजी तब्बल साडे सहा हजार रुपये खर्च केले, असा आरोपही त्यांनी केला.

दरोडा घालणारे चोरीची भाषा करताहेत
आमचे सरकार आले तेव्हा 77 हजार कोटी एफडी होत्या त्यामध्ये वाढ होऊन त्या आता 88 हजार कोटी झाल्या आहेत. गेल्या 15 ते 20 वर्षांत हे पैसे कोठे जात होते याची चौकशी केली जात आहे. दरोडा घालणारे चोरीची भाषा करु लागले आहेत, हा चांगला बदल आहे. मोर्चे काढून लोकांना तुम्ही यापुढे फसवू शकणार नाही. मुंबईकरांना सुविधा देण्याचे काम सरकार महापालिका राज्य सरकारच्या माध्यमातून करणार असे ते म्हणाले.

खरा मोर्चा मातोश्री 1 ते मातोश्री 2 वर हवा
डबल इंजिनचे सरकारचे काम जोरात सुरु आहे. शासन आपल्या दारीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही दररोज लोकाभिमुख निर्णय घेत आहोत. शिवसेनेत दररोज प्रवेश सुरु आहेत. येथे कामाला संधी आहे. आज काढण्यात आलेल्या मोर्चाचे ठिकाण चुकले. खरा मोर्चा मातोश्री 1 ते मातोश्री 2 दरम्यान काढण्याची खरी गरज होती. कारण, जो काही गैरव्यवहार झाला आहे तो याच ठिकाणी झाला आहे, असा हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

केवळ भाषणाने रेशन मिळत नाही
कोविड काळात सर्व घाबरुन घरात बसले होते. ज्यांच्यात हिंमत होती ते रस्त्यावर उतरुन काम करत होते. त्यामध्ये राहुल कनालचा समावेश होता. आपल्यासाठी सर्व जगतात, दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरतो तोच खरा नेता असतो. कोविडमध्ये केवळ भाषण देऊन रेशन मिळत नाही, असा टोला मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उध्दव ठाकरे यांना लगावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -