Saturday, April 20, 2024
Homeकोल्हापूरKolhapur : बाजारभोगावच्या बाजारपेठेत घुसले पुराचे पाणी; चाळीस दुकाने पाण्याखाली

Kolhapur : बाजारभोगावच्या बाजारपेठेत घुसले पुराचे पाणी; चाळीस दुकाने पाण्याखाली

जांभळी व कासारी नद्यांच्या उगमक्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे नद्यांच्या पूराच्या पाण्यात वाढ झाली आहे. पोर्ले पुलाजवळील पडसाळी रस्ता पाण्याखाली गेल्याने जांभळी खोऱ्यातील सर्व गावांचा संपर्क तुटला आहे. तर बाजारभोगाव (ता. पन्हाळा ) येथील बाजारपेठेत पूराचे पाण्याची एन्ट्री झाली आहे. बाजारपेठेत सखल भागात असणाऱ्या चाळीस दुकानात पाणी शिरले असून चार कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तहसिलदार रमेश शेंडगे यांनी बाजारभोगावला भेट देवून पूरस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळी विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारनंतर पुन्हा बरसायला सुरुवात केली. एकीकडे जोरदार पाऊस तर दुसरीकडे कासारी मध्यम प्रकल्पातून १०९० क्यूसेक प्रती सेकंद दराने असणारा विसर्ग यामुळे पूराच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. परिसरातील सर्व लघुपाटबंधारे तलाव पूर्णतः भरल्याने त्यातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पूराच्या पाण्यात भर पडू लागली आहे. सध्या बाजारभोगाव व पोहाळे तर्फ बोरगाव दरम्यान मोडका वड नावाच्या शेतातील मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने सध्या पोहाळे -पोहाळवाडी या पर्यायी मार्गाने नागरिकांची ये-जा सुरू आहे.

बाजारभोगाव येथील बाजारपेठेत पाणी शिरले आहे. मंडलाधिकारी बी.एस. खोत यांनी यापूर्वीच सर्व दुकानदार व पूरक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना नोटीसा बजावल्या आहेत. दुकानदारांना पूराच्या आधी साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सर्व दुकानदारांनी साहित्य स्थलातरीत केले आहे. सध्या नविन बोट तैनात करण्यात आली असून पूरस्थितीला सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनातून सर्व उपाययोजना सज्ज केल्या असल्याची माहिती तहसिलदार रमेश शेंडगे यांनी दिली. नागरिकांनी जीव धोक्यात घालून पूराच्या पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. यावेळी मंडल अधिकारी बी. एस. खोत, तलाठी अनिल पर्वतेवार, वीणा कांबळे, एकनाथ गंभीरे, प्रज्योत निर्मळे, कोतवाल संभाजी कुंभार, सरपंच माया नितीन पाटील, पोलिसपाटील छाया पोवार, सतीश पाटील, अमोल कांबळे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -