यळगूड येथील त्या मुलीचा मृतदेह आढळला पंचगंगेत…सावत्र बापाने पंचगंगा नदीत ढकलून दिलेल्या यळगूड येथील प्रणाली युवराज साळुंखे (वय ९) या मुलीचा मृतदेह मंगळवारी पंचगंगा नदीपात्रात मिळून आला. नगरपालिकेच्या आपत्कालिन पथकाने मृतदेह पाण्याबाहेर काढला. प्रणाली हिचा मृतदेह पाहताच तिची आई, मामासह नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.

निर्दयी पिता युवराज याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली. निर्दयी पित्यानेच सावत्र मुलीला नदीत ढकलून तिचा खून केल्याच्या घटनेमुळे इचलकरंजी, यळगूड परिसर हादरला आहे. विविध स्तरातून संतापाची लाट उसळली आहे. प्रणालीचा मृतदेह सापडल्याचे वृत्त समजताच यळगूड गाव सुन्न झाले.

यळगूड येथील प्रणाली साळुंखे ही अल्पवयीन मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. या मुलीचा सांभाळ करण्याच्या कारणावरून सावत्र पिता युवराज साळुंखे यानेच तिला पळवून नेवून पंचगंगा नदीत फेकून दिल्याचे सोमवारी उघडकीस आले होते.

सोमवारपासून इचलकरंजीतील पंचगंगा नदी पात्रामध्ये प्रणालीचा शोध सुरू होता. सोमवारी रात्री उशिरापर्यंत तिचा शोध सुरू होता.

मात्र अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते. मंगळवारी पहाटेपासून नगरपालिकेच्या आपत्कालिन विभागाचे प्रमुख संजय कांबळे यांच्यासह त्यांच्या पथकाकडून शोध घेण्यात येत होता. सकाळी १० च्या सुमारास पंचगंगा नदी पात्रात स्मशानभूमीच्या समोरील बाजूस शिरदवाडच्या बाजूकडील पात्रात एका झुडपात प्रणाली हिचा मृतदेह मिळून आला.

पथकाने मृतदेह पाण्याबाहेर काढला. नातेवाईकही सकाळपासूनच शोध कार्याच्या ठिकाणी थांबून होते. मृतदेह पाण्याबाहेर काढताच चिमुकल्या प्रणालीचा मृतदेह पाहून आई, तिचा मामा तसेच अन्य नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, हुपरीचे पोलिस निरीक्षक ए. पी. मस्के आदींनी धाव घेतली. नातेवाईक तसेच नागरिकांनी यावेळी निर्दयी पिता युवराज याला कठोरातील कठोर शिक्षा करावी, त्याला फाशी द्यावी अशी मागणी केली.

अप्पर पोलिस अधीक्षक गायकवाड यांनी कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा लागावी यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.
इंदिरा गांधी इस्पितळात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. यावेळी प्रणालीच्या नातेवाईकांसह पिता युवराज याचे नातेवाईकही जमले होते. त्यांच्यात काहीवेळ वादावादीचा प्रकार घडल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

इस्पितळाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. संशयितावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. निर्दयी पिता युवराज साळुंखे याला हुपरी पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group