शेत जमिनीच्या वादाचा निकाल आपल्या बाजूने देतो असे सांगून ३ लाख रुपयांची लाच घेताना भिकाजी नामदेव कुराडे (वय ५५, रा. चंदूर ता.हातकणंगले) याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दुपारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई मध्यवर्ती बसस्थानकासमोरील एका हॉटेल जवळ झाली.
या प्रकरणी पथकाने सारंग भिकाजी कुराडे (वय २६, रा.साईनगर चंदूर), इम्रान मुसा शेख (वय ४१, रा.शंभर फुटी रोड, सांगली) या दोघा संशयीतांनाही ताब्यात घेतले आहे. ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या पथकाने केली.
बुधवंत यांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांची शिरोळ(Shirol) तालुक्यात शेतजमीन आहे. या शेत जमिनीच्या मालकीचा वाद सध्या सुरू आहे.
सुरवातीला प्रांत कार्यालयात तक्रारदार यांच्या विरोधात निकाल गेला होता.त्यानंतर तक्रारदार यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
तक्रादार यांच्याशी कुराडे याने संपर्क साधला. निकाल आपल्याबाजूने लावून देण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली. त्यातील २ लाख रुपये कुराडे याने घेतली होती. उर्वरित ३ लाखाची रक्कम घेत असताना कुराडे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडला. या कारवाईत शरद पोरे, नवनाथ कदम, संदीप पडवळ, मयूर देसाई, सुरज अपराध आदींनी सहभाग घेतला होता.