शिंदे गटाचे टेन्शन वाढणार! कट्टर विरोधक उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर; शिवबंधन बांधणार?

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले.
टोकाला गेलेल्या संघर्षात शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाला राज्यातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटही प्रचंड सक्रीय झाला असून, बंडखोरांना पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. अनेक बड्या नेत्यांनी गेल्या काही महिन्यात शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधत मातोश्रीवरूनच एकनाथ शिंदे गटाविरोधात एल्गार पुकारल्याचे पाहायला मिळाले.

यातच आता शिंदे गटाचे आमदार आणि शिवसेनेचे विधिमंडळ मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या कट्टर विरोधक असलेल्या एका नेत्यानी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आता हा नेता शिवबंधन बांधणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आल्या होत्या. यावेळी शिवसेना नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई सोबत होते.

भरत गोगावले यांच्या कट्टर राजकीय विरोधक

स्नेहल जगताप या कोकणातील महाड विधानसभा मतदारसंघातील शिंदे समर्थक आमदार भरत गोगावले यांच्या कट्टर राजकीय विरोधक मानल्या जातात. त्या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. महाडमधील प्रमुख राजकीय नेत्यांपैकी त्या एक आहेत. स्नेहल जगताप यांना चार ते पाच वेळा मातोश्रीवर येण्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याचं बाोलले जात आहे. अखेर जगताप-ठाकरेंची भेट झाल्याची माहिती आहे. स्नेहल जगताप शिवबंधन बांधणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, ही निव्वळ सदिच्छा भेट असल्याचा दावा दोन्ही बाजूंनी केला जात आहे. परंतु २०२४ मधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच ठाकरेंनी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. सुनील प्रभू यांना हटवून शिंदे गटाने शिवसेनेचे विधिमंडळ मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केली होती. भरत गोगावले हे रायगडमधील महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर तीन टर्म आमदार आहेत. २००९ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांचा पराभव करुन ते आमदार झाले.

Join our WhatsApp group