Homeकोल्हापूरगुन्हा दाखल झाल्यास साऊंड, लाईट ऑपरेटर होणार हद्दपार

गुन्हा दाखल झाल्यास साऊंड, लाईट ऑपरेटर होणार हद्दपार

गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली असून, सराईत गुंडांची कुंडली तयार केली आहे. याचसोबत साऊंड व लाईट सिस्टीम ऑपरेटरचीही कुंडली तयार केली असून, ज्या ऑपरेटवर मागील पाच वर्षांत गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच यावर्षी गुन्हे दाखल झाल्यास त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी शनिवारी क्राईम आढावा बैठकीत दिला.

 

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली. यामध्ये नीलोत्पल यांनी १४ मुद्द्यांची नियमावली जाहीर केली. तसेच सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

 

ड्रोन, लेझर बंदी

 

गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत यंदा सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोनला बंदी घातली आहे. याचसोबत प्रेशर मिड, मिक्सर, लेझर, फॉग मशिनवर बंदी घातली आहे.

 

मंडपात अग्निरोधक यंत्रणा

 

मंडळांच्या मंडपांमध्ये सीसीटीव्ही व अग्निरोधक यंत्रणा बसविणे आवश्यक असेल. याचसोबत वाहतुकीस अडथळा होणार नाही अशी मंडप उभारणी करणे आवश्यक आहे. मंडपांचे आकार तपासून स्थानिक प्रशासन व वाहतूक शाखेने पडताळणी करून दिलेला नाहरकत दाखला सर्वांना बंधनकारक आहे.

 

‘अन्न-औषध’ची घेणार मदत

 

गणेशोत्सव काळात अनेक मंडळांकडून प्रसाद वाटप, महाप्रसादाचे आयोजन केले जाते. याची पडताळणी अन्न व औषध प्रशासनाकडून केली जाणार आहे.

 

गणराया ॲवॉर्डने सन्मान

 

साऊंड सिस्टीमला फाटा देत पारंपरिक वाद्यांचा वापर, पर्यावरणपूरक गणेशोत्सव तसेच अनेक विधायक उपक्रम राबविणाऱ्या मंडळांना गणराया ॲवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. याचसोबत सार्वजनिक मंडळांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सहकार्य म्हणून ‘गणपती मंडळ दत्तक योजना’ राबविली जाणार आहे.

 

गुंडांची कुंडली तयार… लवकरच हद्दपारी

 

उत्सव काळात कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या सराईत गुंडांची यादी तयार केली आहे. त्यांच्यावर लवकरच प्रतिबंधात्मक तसेच हद्दपारीची कारवाई केली जाणार आहे. याचसोबत संबंधित गुन्हेगारांच्या नावाची यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -