Homeमहाराष्ट्र२५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, दीड महिन्यापूर्वी झालेलं लग्न; पत्नीसह कुटुंबावर दुःखाचा...

२५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, दीड महिन्यापूर्वी झालेलं लग्न; पत्नीसह कुटुंबावर दुःखाचा डोंगर

भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने शनिवारी (ता. ५) मृत्यू झाला. श्याम रोकडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

विशेष म्हणजे, दीड महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. संसाराची नुकतीच सुरुवात झालेली असतानाच श्याम यांच्यावर काळाने घाला घातल्याने कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

 

श्याम रोकडे यांचे वास्तव्य बाणेर परिसरात होते. मागील दोन वर्षांपासून ते स्वतःची स्विफ्ट डिझायर कार घेऊन भाविकांना विविध धार्मिक स्थळी ने-आण करण्याचा व्यवसाय करीत होते. त्यातूनच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

 

शनिवारी पिंपरी-चिंचवड परिसरातील काही भाविकांना ते भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आले होते. दर्शनासाठी आल्यानंतर अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काही वेळातच त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यांना तातडीने तळेघर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले.

 

त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. यासाठी डॉक्टर प्रज्वल बाणखेले यांनी प्रयत्न केले. मात्र, मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

 

संसाराची स्वप्ने अधुरीच

 

श्याम रोकडे यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दीड महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या श्याम यांच्या संसाराची स्वप्ने नुकतीच आकार घेत असताना त्यांचा अचानक मृत्यू झाल्याने पत्नीवर मोठा आघात झाला आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाच्या निधनाने नातेवाईक आणि परिचितांनाही मोठा धक्का बसला आहे.

 

श्याम यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. भाविकांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचविण्याचे काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या श्याम यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -