देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी १ ऑक्टोबरपासून रोख रक्कम काढणे आणि एटीएम व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत.
बँकेने प्रामुख्याने ‘सॅलरी पॅकेज खातेदार’ आणि ‘बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट’ (BSBD) खातेदारांसाठीच्या सेवा शुल्कात आणि मोफत व्यवहारांच्या मर्यादेत सुधारणा केली आहे. नव्या नियमांनुसार, सॅलरी खातेधारकांना इतर बँकांच्या एटीएमवर मिळणाऱ्या मोफत व्यवहारांची संख्या निम्म्याने कमी करण्यात आली आहे. तसेच बीएसबीडी खात्यातून महिन्याभरात चारपेक्षा जास्त वेळा रोख रक्कम काढल्यास प्रत्येक व्यवहारावर अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. सॅलरी खातेदारांसाठी इतर बँकांच्या एटीएम मर्यादांमध्ये कपात सध्या एसबीआयच्या सॅलरी पॅकेज खात्यांच्या (Salary Package Account) सर्व प्रकारांमधील खातेदारांना इतर बँकांच्या एटीएम किंवा ऑटोमेटेड डिपॉझिट कम विथड्रॉल मशिन्सवर (ADWM) दरमहा १० मोफत व्यवहार मिळतात.
१ ऑक्टोबरपासून ही मर्यादा कमी करून दरमहा ५ मोफत व्यवहारांवर आणली जाणार आहे. या ५ मोफत व्यवहारांमध्ये आर्थिक (Financial – पैसे काढणे) आणि बिगर-आर्थिक (Non-Financial – मिनी स्टेटमेंट, बॅलन्स तपासणे) अशा दोन्ही प्रकारच्या व्यवहारांचा समावेश असेल. हे ५ व्यवहार संपल्यानंतर लागू असलेले नियमित शुल्क आकारले जाईल. मर्यादा संपल्यानंतर इतर बँकेच्या एटीएमवरून रोख रक्कम काढल्यास प्रति व्यवहार २३ रुपये अधिक जीएसटी (GST) आणि बिगर-आर्थिक व्यवहारासाठी ११ रुपये अधिक जीएसटी आकारला जाईल.
