शेअर्स, डॉलर्समध्ये गुंतवणूक करून रक्कम दामदुप्पट करण्याचे आमिष दाखविणार्या सांगलीतील एका कंपनीच्या म्होरक्याने दुबईला पलायन केले आहे. यामुळे सांगली शहरासह जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडण्याची शक्यता आहे. पैसे मिळण्यासाठी शेकडो लोक दररोज या कंपनीच्या कार्यालयात गर्दी करीत आहेत. लोकांचा ससेमिरा टाळण्यासाठी कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकले आहे.
मागील दोन वर्षांपासून सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांसह कर्नाटकात अशा बोगस मल्टिपर्जज कंपन्यांनी आपले जाळे पसरविले आहे. शाखा काढण्यासाठी एजंटांकडून 10 ते 20 लाख रुपये घेतले आहेत. या शाखाद्वारे कमिशन एजंट नेमून गुंतवणूकदारांना कमी कालावधीत जादा व्याजाचे आमिष दाखवून मोठी रक्कम गुंतवण्यास सांगितले जात आहे.तसेच काहींनी फॉरेन मनी एक्स्चेंजच्या नावाखाली गंडा घालण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पहिल्या काही गुंतवणूकदारांना स्टॉक, कमोडिटी, फॉरेक्स करन्सी अशा विविध मार्केटच्या नावावर अल्पावधीत पैसे दुप्पट करून दिले गेले.
यांना ब्लॉक चेन करण्यास सांगून नवनवीन लोकांना यात ओढले जात आहे. विशेषत: यात दोन नंबरचा पैसा मिळणार्यांची यादी काढून त्यांना संपर्क केला जात आहे. जिल्ह्यात अशा शेअर्स व फॉरेक्स कंपन्यांचे पेव फुटले आहे. शहरातील ब्लॅक मनीवाले, गावातील सावकार, कंत्राटदार, काही बडे अधिकारी यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून ब्लॅकचे व्हाईट करीत आहेत. तसेच अनेक मध्यमवर्गीयांनी अशा योजनांना भुलून लाखो रुपये गुंतविले आहेत; पण याचा हळूहळू भांडाफोड होत आहे. ग्राहकांत जागृती होत आहे. यामुळे सुरू असणारी साखळी थांबली आहे. पैशाचा ओघ थांबल्याने परतावा देण्याचे गेल्या काही महिन्यांपासून थांबले आहे.
यामुळे ग्राहकांनी पैसे परत मागण्याचा तगादा लावला आहे. यामुळे गेली काही दिवस कंपनीचा म्होरक्या व एजंटांनी मोबाईल बंद करून ठेवले आहेत. यामुळे गुंतवणूकदार थेट कार्यालयात पोहोचत आहेत. पण या भामट्यांनी कार्यालयास टाळे ठोकून पोबारा केला आहे. 50 लाखांच्या अलिशान चारचाकीतून फिरणारे घोटाळा उघडकीस येण्याच्या भितीने अंडरग्राऊंड झाले आहेत. मुख्य म्होरक्याने गेल्या आठवड्यात दुबईला पलायन केल्याची चर्चा आहे. त्यांने व्हीसीवरून आता परतावा देणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे.