शनिवारी सायंकाळी मादळे (ता. करवीर) येथील चार बंगले परिसरातून पोहाळेच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या तीन गव्यांचा कळप रविवारी सकाळी कासारवाडी, सादळे येथील पहिल्या घाटात नागरिकांच्या निदर्शनास आला. आता पुन्हा गवे कासारवाडी, सादळे परिसरात वावरू लागले आहेत.
मागील काही दिवसांपासून अंबप, मनपाडळे, पाडळी येथील शेतवडीतून तीन गव्यांचा कळप शनिवारी मादळे परिसरातून पोहाळेच्या दिशेने मार्गस्थ झाल्याचे नागरिकांनी पाहिले होते. यामुळे नागरिकांसह वनविभागाला दिलासा मिळाला होता. पोहाळेच्या दिशेने गेलेले गवे गिरोली, जोतिबामार्गे पन्हाळ्याकडे आपल्या नैसर्गिक अधिवासात मार्गक्रमण करतील, असा वन विभागाचा अंदाज होता.
पण रविवारी सकाळी सातच्या सुमारास कासारवाडी, सादळे घाटात गवे घुटमळताना नागरिकांच्या निदर्शनास आलेे. शेतमजूर सकाळी गवत कापण्यासाठी जंगलात जात होते. यातील अनेक नागरिकांना गव्यांचा कळप निदर्शनास आला आणि शेतात गेलेल्या शेतमजुरांत घाबरट पसरली व शेतमजूर परत फिरले.