भडगाव ( ता.गडहिंग्लज) येथील शीतल गजानन गाडवी (वय 47) यांचा पत्नी गायत्री (42) हिने दगड डोक्यात घालून बुधवारी रात्री निर्घृणपणे खून केला होता. पती व्यसनाधीन असल्याने सातत्याने शिवीगाळ करण्यासह मारहाण करत होता. वारंवार होणार्या या त्रासाला कंटाळूनच आपण त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबूली पत्नी गायत्री हिने दिली आहे. तिला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बुधवारी पती-पत्नीमध्ये नेहमीप्रमाणे वाद झाला होता. यामुळे पती शीतल याने पोलिस पाटील उदय पुजारी यांच्याकडे जाऊन पत्नी गायत्रीने आपल्याला काठीने मारहाण केल्याचे सांगितले होते.
यावेळी पुजारी यांनी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार करण्याबाबत सांगितले होते. याचवेळी पत्नी गायत्री हिने त्याला घराकडे नेले होते. यानंतर रात्रीच्या सुमारास पुन्हा शीतल हा कॉटवर बसून गायत्री हिला शिवीगाळ करू लागल्याने रागाच्या भरामध्ये आपण दगड डोक्यात घातल्याचेही गायत्री हिने कबूल केले. पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके या प्रकरणाचा तपास करत आहेत.