कोरोना व्हायरस आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यभरात शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठ पुन्हा सुरू होणार आहेत. राज्यात 1 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील सरकारकडून मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. परंतु कोरोना प्रतिबंधात्मक (Corona Vaccine) लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे नवे रुग्ण देखील कमी आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील महाविद्यालये येत्या 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. मात्र, शाळांप्रमाणेच महाविद्यालये, विद्यापीठे सुरू करण्याचे अंतिम अधिकार स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आले आहेत.
राज्यातील महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. परंतु कोरोना परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या, असे देखील निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, अशाच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.