आज देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त देशातील विविध भागांतून भारतीय सैन्यांचे साहस आणि ते उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करत असल्याचे व्हिडिओज समोर आले आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर तैनात असलेले आपले जवान मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा करत आहेत.
लडाखमध्ये सध्या बर्फवृष्टी होत असून येथे हाडे गोठवणारी थंडी आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत लडाखमध्ये इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी (ITBP) १५ हजार फूट उंचीवर उणे ३५ अंश सेल्सियस तापमानात प्रजासत्ताक दिन साजरा केला. येथील एक व्हिडिओ ITBP ने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. यात जवान तिरंगा फडकावत असल्याचे दिसतात. ‘आईटीबीपी के हिमवीरों का राष्ट्र को नमन’ अशी कॅप्शन देत ITBP कडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या #RepublicDay पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीर पासून कन्याकुमार पर्यंत कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तर दिल्लीतील राजपथावर होत असलेल्या संचलनात देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी झाले आहेत.