तासगाव-भिलवडी रस्त्यावर एका ढाब्यासमोर उभ्या असलेल्या तिघांना छोटा हत्तीने जोराची धडक दिल्याने सांगली जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल नारायण शिंदे (रा, शिवाजीनगर, तासगाव), दीपक उर्फ शिवाप्पा शिदलीग स्वामी रा, नाट्यगृहाजवळ, तासगाव) हे दोघे जागीच ठार झाले. तर सचिन दतात्रय बाबर (रा, शिक्षक कॉलनी, पुनदी रस्ता, तासगाव) हे जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झाला.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, राहुल शिंदे, दीपक स्वामी व सचिन बाबर हे तासगाव – भिलवडी रस्त्यावरील एका ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा जेवण करून ते ढाब्याच्या बाहेर रस्त्याकडेला बोलत थांबले असता, भिलवडीच्या दिशेकडून आलेल्या छोटा हत्ती (एम एच १० बी आर ५२०४) या वाहनाने तिघांना जोराची धडक दिली.
हि धडक एवढी जोरात होती की, या धडकेने तिघांच्याही डोक्याला गंभीर मार लागून ते रस्त्यावर जोरात आपटले गेले. यात राहुल शिंदे आणि दीपक स्वामी हे जागीच ठार झाले. तर सचिन बाबर गंभीर जखमी झाले. त्यांना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.