मयत पास देण्याची चोवीस तास व्यवस्था केलेल्या रुग्णालयातील कर्मचार्यांच्या कामचुकारपणाचा फटका मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना बसत आहे. रुग्णालयातील कर्मचार्यांकडून विविध कारणे सांगून पास देणे टाळले जाते, नातेवाईकांना वैकुंठ स्मशानभूमी किंवा इतर ठिकाणांची नावे सांगितली जातात. त्यातच मनुष्यबळाच्या अभावामुळे वैकुंठ स्मशानभूमीत सुरू केलेली चोवीस तास सेवा पाच दिवसातच बंद करण्यात आली. त्यामुळे मयत व्यक्तीच्या नातेवाईकांची चांगलीच ससेहोलपट होत आहे.
महापालिका हद्दीत एखाद्या व्यक्तीचा अपघाती, आजाराने किंवा नैसर्गीक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेचा मयत पास असणे बंधनकारक आहे. खासगी किंवा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर कोणत्या कारणाने मृत्यू झाला आहे, याचा उल्लेख असलेले प्रमाणपत्र दिले जाते. ते प्रमाणपत्र महापालिकेच्या मयत पास केंद्रात दिल्यानंतर मयत पास मिळतो. तर घरी मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी स्थानिक नगरसेवक प्रमाणपत्र देतात, त्या प्रमाणपत्रावर मयत पास दिला जातो. एखाद्या मध्यम वयीन वक्तीचा घरी मृत्यू झाल्यास त्याच्या मृतदेहाचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करून पोलिस पंचनाम्यानंतर मयत पास मिळतो. मयत पास स्मशानभूमीत दिल्यानंतरच पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातात.
महापालिकेच्या 19 रुग्णालयांमध्ये हव्या त्या वेळी मयत पास मिळत नाहीत. पास देणारे कर्मचारी जागेवर उपस्थित नसतात. अनेक वेळा उपस्थित असले तरी इतर कारणे आणि कामे सांगून दुसरीकडून पास घ्या, असे सांगितले जाते. बहुतांश वेळा मयत पास घेण्यासाठी नातेवाईकांना वैकुंठ स्मशानभूमीतच पाठवले जाते. त्यातच वैकुंठ स्मशानभूमीमध्ये मयत पास सकाळी 9 ते 5 या वेळेतच मिळतो.
त्यानंतर मयताच्या नातेवाईकांना महापालिकेच्या या रुग्णालयातून त्या रुग्णालयात मयत पाससाठी फिरावे लागते. या सर्व परिस्थितीला ससून रुग्णालयातील केंद्र मात्र अपवाद आहे. या ठिकाणी चोवीस तास केव्हाही पास मिळतो.