शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळविणाऱ्या शिक्षकांचा आता शोध सुरू करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील बोगस शिक्षकांचा पर्दाफाश होणार आहे. बोगस शिक्षकांचा शोध सुरु करण्यात आल्यामुळे राज्यभरातील शिक्षक चिंतेत आले आहेत. बुधवारपर्यंत राज्यातील जवळपास सहा हजार शिक्षकांनी टीईटी प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्य परीक्षा परिषदेकडे जमा झाले आहेत. संपूर्ण पडताळणीनंतरच दोषी शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यात 13 फेब्रुवारी 2013नंतर नियुक्त झालेल्या पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे या कालावधीत नोकरी मिळविलेल्या बनावट शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार असणार आहे. याचदरम्यान शिक्षण परिषदेने याप्रकरणी जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र तपासण्याचे आदेश दिले आहेत. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली आहे. शिक्षकांना परीक्षा परिषदेकडे टीईटीचे मुळ प्रमाणपत्र पाठविणे बंधनकारक असणार आहे नाही तर त्यांना पगार मिळणार नाही. जे शिक्षक आपले मूळ प्रमाणपत्र पाठविणार नाही, त्यांचा पगार थांबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्यातील बोगस शिक्षकांचे बिंग फुटणार आहे.