बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे मुरबाड तालुक्यात चार आदिवासी रुग्णांना प्राण गमवावे लागले. त्यानंतर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बोगस डॉक्टरांवर आळा बसावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांच्या नावांची यादी दर्शनी भागात लावावी. प्रत्येक ग्रामसभेत अधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची नावांचे वाचन करावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने आज येथे दिल्या. त्यावेळी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ११, मुरबाड आणि कल्याणात प्रत्येकी एक अशा एकूण १३ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उप जिल्हाधिकारी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध पुनर्विलोकन समितीची बैठक झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, पोलीस उपअधीक्षक मुणगेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोषी शिंदे, अन्न व औषध प्रशासन विभाग, पोलिस, तालुका आरोग्य अधिकारी संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.