कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन हा शब्द पर्वलीचा झाला. मात्र आता करोना प्रादुर्भाव कमी आहे आणि लॉकडाऊनही नाही. तरी सुद्धा लाखांदूर तालुक्यातील काही गावांमध्ये सूर्यास्तानंतर लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण झाली आहे. याला कारण ठरलेत वाघोबा. हो तुम्ही नीट वाचलत वाघोबा. वाघाच्या नियमित संचारामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. वाघाच्या दहशतीमुळे येथील गावकरी सूर्यास्तानंतर घरात बंदिस्त होत आहेत. या गावांमध्ये अलिखित संचारबंदीचे चित्र निर्माण झाले आहे.
लाखांदूर तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून पट्टेदार वाघ व बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. २७ जानेवारीच्या पहाटे दहेगाव जंगलात सरपण गोळा करणाऱ्या प्रमोद चौधरी याला बिबट्याने ठार केले. या घटनेमुळे गावकरी कमालीचे हादरले आहेत. तत्पूर्वी, ३१ डिसेंबर रोजी दोनाड येथे वाघ आल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली होती. वनविभागाने शोधमोहीम सुरूच ठेवली, मात्र काहीच हाती आले नाही.