Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रआरोग्यमंत्री राजेश टोपे : राज्यात निर्बंध कमी होणार!

आरोग्यमंत्री राजेश टोपे : राज्यात निर्बंध कमी होणार!

ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. तिसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात ती संपेल. यादरम्यान राज्यातील निर्बंध कमी करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी (दि. 4) येथे स्पष्ट केले.

मुंबई, पुणे आणि ठाण्यासारख्या शहरांतील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे ते म्हणाले. जालन्यात फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन टोपे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, राज्यातील कोरोना परिस्थितीवर मंत्रिमंडळाची आढावा बैठक झाली. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोना आकडेवारीमध्ये मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात दररोज 48 हजार रुग्णसंख्या आढळत होती. ती कमी होऊन 10 ते 15 हजारांवर आली आहे.

ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळत होती, तिथेही रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि रायगड यासारख्या जिल्ह्यांत कोरोना रुग्ण कमी झाले आहेत. मुंबईसारख्या मोठ्या शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या पाचशे-सहाशेवर आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा ग्राफ कमी होत आहे. मार्च महिन्यापर्यंत राज्यातील कोरोनाची तिसरी लाट ओसरेल, असे वाटते. सर्व आढावा घेऊन राज्यातील निर्बंध कमी करण्यात येईल.

12 वर्षांवरील मुलांचे लसीकरण सुरू करावे

ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या वाढली नव्हती, त्या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढेल अन् कमीही होईल, असेही टोपे म्हणाले. 12 वर्षांवरील मुलांचे केंद्र सरकारने लसीकरण सुरू करावे, त्यासाठी राज्य तयार आहे. लसीचा मागणीप्रमाणे पुरवठा झाला नाही तर यासाठी केंद्राने काळजी घेणे गरजेचे असल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

कोरोनाची घसरण सुरूच

मुंबईत शुक्रवारी 24 तासांत 846 कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 7 जणांचा मृत्यू झाला, तर 24 तासांत तब्बल 1 हजार 297 रुग्ण बरे झाले. सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजार 135 इतकी खाली आली आहे. 24 तासांंत 44 हजार 323 चाचण्या करण्यात आल्या.

राज्यात शुक्रवारी 13 हजार 840 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 27 हजार 891 रुग्ण बरे झाले. राज्यभरात सध्या 1 लाख 44 हजार रुग्ण सक्रिय आहेत. शुक्रवारी राज्यात एकाही ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झाली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -