आजारावर उपचारासाठी सात दिवसांच्या शिबीराचे आमिष दाखवत पतंजली नावाच्या बनावट बेवसाईटच्या माध्यमातून तरूणाला ३३ हजाराला ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित अशोक पाटील (वय-४१) रा. अमळनेर जळगाव हे खासगी हॉस्पीटलमध्ये काम करतात. पतंजली योगपीठ हरीद्वार या ठिकाणी असलेल्या शिबिरात कसे जावे यासाठी त्यांनी गुगल सर्च मध्ये जावून माहिती घेतली. त्यावर त्यांना मिळालेल्या एका नंबरवर कॉल केला असता त्यांना समोरील व्यक्तीने आमचा एजंट तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करेल असे सांगितले. त्यानुसार त्यांना एका अनोळखी नंबरवरून कॉल आला.
त्यांनी सांगितले की, सात दिवसांचा हा कार्स आहे. यासाठी हरीद्वार येथे तुम्हाला यावे लागेल. उपचारासाठी खर्च नसतो परंतू राहण्यासाठी २० हजार रूपये खर्च लागेल असे सांगितले. त्यानुसार सुमित पाटील यांनी २० हजार रूपये ऑनलाईन पाटविले. त्यानंतर समोरील व्यक्तीने पुन्हा पैश्यांची मागणी केली असता सुमित पाटील यांनी पुन्हा १३ हजार रूपये ऑनलाईन पाठविले. दरम्यान सुमित यांनी अमळनेर शहरातील पतंजली शॉप मध्ये जावून चौकशी केली असता शिबिरात जाण्यासाठी अशी कोणत्याही प्रकारची पध्दत नसल्याचे सांगितले. त्यावरून आपली फसवणूक झाल्याचे अमीत यांच्या लक्षात आले. त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अनोळखी नंबर धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विलास पाटील करीत आहे.








