आपण वर्षानुवर्षे एखादी गाडी वापरत असू तर साहजिकच त्या वाहनाशी आपला भावनिक बंध तयार होतो. त्यामुळे गाडी विकायची किंवा जुनी झाल्यामुळे ती भंगारात काढायची झाली तरी अनेकांच्या जीवावर येते. बऱ्याचदा एखाद्या वाहनाचा क्रमांक हीच त्या व्यक्तीची ओळख बनून जाते. अशावेळी गाडी विकल्यावर अनेकांना आपली ओळख हिरावून घेतल्यासारखे वाटते. मात्र, आता गुजरात सरकारने वाहनचालकांची ही अडचण ओळखून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एखाद्या व्यक्तीने गाडी विकली किंवा भंगारात दिली तरी वाहनाचा क्रमांक त्याच्याकडे कायम राहील. अर्थात वाहनाचा क्रमांक स्वत:कडे ठेवण्यासाठी शुल्क भरावे लागेल. निर्धारित शुल्क भरुन हा क्रमांक हस्तांतरित केला जाऊ शकतो.
गुजरातचे परिवहन मंत्री पूर्णेश मोदी यांनी नुकतीच याबाबत घोषणा केली. त्यांनी म्हटले की, वाहनाचा क्रमांक स्वत:कडे ठेवण्याची व्यवस्था दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये आधीच अस्तित्वात आहे आणि आता ती गुजरातमध्ये सुरू करण्यात आली आहे. लोक त्यांच्या वाहन नोंदणी क्रमांकाशी धार्मिक श्रद्धा किंवा अंकशास्त्र यांसारख्या अनेक कारणांनी जोडलेले असतात. काही वाहनधारक भावनिकदृष्ट्या त्या नंबरशी जोडलेले असतात. त्यामुळे जुनाच नंबर परत मिळावा, अशी मागणी नेहमीच वाहनमालकांकडून होत असते. त्यामुळे आता गुजरातमधील वाहनधारक त्यांचे वाहन विकल्यानंतर किंवा स्क्रॅप केल्यानंतरही जुनाच नंबर कायम ठेवू शकतात,”