केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील मलमपुझा येथील खोल दरीत दोन दिवस (सुमारे ४८ तास) अडकून पडलेल्या एका ट्रेकरची भारतीय आर्मीच्या जवानांनी बुधवारी सुखरूप सुटका केली. चेरात्तील बाबू (वय २३) नावाचा युवक सोमवारी ट्रेकिंग दरम्यान दरीत कोसळून अडकून पडला होता. दरातील एका अवघड ठिकाणी तो बसून राहिला होता. त्याला एका जागेवरून हालताही येत नव्हता. दोन दिवस त्याने अन्न पाण्याविना घालवले. त्याला वाचविण्यासाठी मोठे रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले.
गिर्यारोहक तज्ज्ञांचा समावेश असलेले भारतीय आर्मीच्या दक्षिण कमांडचे पथक रेस्क्यू ऑपरेशनसाठी मंगळवारी रात्री उशिरा मालमपुझा येथे दाखल झाले होते. बुधवारी पहाटे दरीत अडकलेल्या युवकापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवगेळ्या ठिकाणांहून प्रयत्न करण्यात आले. अखेर आर्मीची रेस्क्यू टीम ज्या ठिकाणी युवक अडकून पडला होता तिथे पोहोचली. तेथे त्याला टीमने पाणी आणि अन्न दिले. कारण तो दोन दिवसांपासून उपाशी होता. दोराच्या साहाय्याने त्याला टेकडीच्या शिखरावर आणण्यात आले.