फेब्रुवारी महिन्यात बँकेशी संबंधित काही काम असेल तर ती लवकरात लवकर करुन घ्या. कारण फेब्रुवारी महिन्याच्या उरलेल्या दिवसांत सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका 11 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये दोन दिवस बँकांच्या संपामुळे बँकांचे कामकाज बंद राहणार आहे आणि उर्वरित दिवसांत शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. बँकांना सुट्ट्या असल्यामुळे ग्राहकांची कामं रखडणार आहेत. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर बँकांची कामं पूर्ण करुन घ्यावीत. नाही तर त्यांना ही कामं पूर्ण करण्यात अडचणी येतील. त्यामुळे पुढच्या दिवसांची सुट्ट्यांची यादी पाहा जेणे करुन तुम्हाला पुढचे नियोजन करणे सोपे जाईल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या सुट्ट्यांची यादी पाहिली तर 15 फेब्रुवारीपासून सुट्ट्या सुरू होतील. गुरु रविदास जयंती, छत्रपती शिवाजी जयंती आणि मोहम्मद हजरत अली यांच्या वाढदिवसानिमित्त बँकांना सुट्टी आहे. तर 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे बँकेच्या शाखेत कामकाज बंद राहणार आहे. तर दुसरीकडे रविवार आणि शनिवार असल्याने बँका पाच दिवस बंद राहणार आहेत. बँका बंद राहणार असल्यामुळे ज्या ग्राहकांना बँकेत जाऊन काम करायचे आहे त्यांना अडचणी येतील. पण ऑनलाइन बँकिंग सेवा सुरु असणार आहे. त्यामुळे ऑनलाइन बँकिंगचा वापर करणाऱ्या ग्राहकांना काहीच समस्या येणार नाही.
महत्वाचे म्हणजे 23 आणि 24 फेब्रुवारीला बँक कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. सरकारच्या कामगारविरोधी आणि जनविरोधी धोरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांच्या संपाचा इशारा दिला आहे. सेंट्रल ट्रेड युनियन आणि इतर संघटनांनी 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी बँक संपाची हाक दिली आहे. या संपात देशभरातील सर्व बँकांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज युनियनच्या केंद्रीय समितीनेही या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बँकांच्या सुट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांतील सणांवरही अवलंबून असतात.