साक्री येथे आज नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड पोलिस बंदोबस्तात होत असतानाच निकालाच्या दिवशी हाणामारीत मयत झालेल्या मोहिनी जाधव यांच्या मुलीने आंदोलनाचा पवित्रा घेत पोलीस प्रशासना समोर आव्हान उभे केले. यावेळी पल्लवी जाधव या मुलीने ठिय्या मांडून आंदोलन सुरू करून पोलीसांची दमछाक केली. या मुलीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
साक्री नगरपंचायतीसाठी १९ जानेवारीला झालेल्या मतमोजणीवेळी साक्री येथील मतदारांनी 40 वर्षांपासून असलेली ज्ञानेश्वर नागरे यांची एकहाती सत्ता उलथवून भाजपला स्पष्ट बहुमत दिले. या नगर पंचयातीतील १७ पैकी भाजपला ११, शिवसेनेला ४, काँगेसला १ आणि अपक्षाला १ जागा दिली. राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. याच दिवशी साक्रीत भाजप कार्यालयात नवनिर्वाचित
नगरसेवकांचा सत्कार सुरु होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत महिला उमेदवाराचा मुलगा गोटू जगताप हा भाजप कार्यालयाजवळ आला. तेथे जगताप व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. जगतापला काही कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली. ही माहिती जगतापच्या कुटुंबाला समजली. त्यामुळे घटनास्थळी जगतापची बहीण, चुलत बहीण मोहिनी जाधव व त्यांची मुले आले. त्यांनी गोटू यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी जमिनीवर पडून मोहिनी जाधव यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला. यातील प्रमुख आरोपींना अटक करण्यासाठी साक्री नगरपरिषदेत २६ जानेवारी रोजी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर देखील मागणीनुसार कार्यवाही न झाल्याने आज नगराध्यक्ष निवड प्रक्रियेवेळी गोटू जगताप व परिवाराने न्यायासाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाने साक्रीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. निवड प्रक्रियेपूर्वी सकाळी अकरानंतर मृत मोहिनी जाधव हिची मुलगी पल्लवी न्यायाबाबत जाब विचारण्यासाठी साक्री नगरपंचायत कार्यालयाजवळ उपस्थित झाली. तिथे तिने ठिय्या मांडला. यावेळी तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच गोटू जगतापला त्याच्या घरातच स्थानबद्ध केले आहे. दरम्यान भाजपने अज्ञातस्थळी ठेवलेले ११ नगरसेवक धुळ्याहून बसने साक्रीत मतदानासाठी दाखल झाले आहेत.