ताजी बातमी ऑनलाईन टीम
गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील एका शाळेत दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण होऊन एकावर चाकूहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पवन अरविंद पाटील (वय 16, रा. घोगरे गल्ली, गोकुळ शिरगाव) हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना
सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास म्हसोबा माळावरील दत्त मंदिराजवळ घडली. किरकोळ कारणावरून शाळकरी विद्यार्थ्यांत चाकूहल्ल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मुख्य संशयितासह तिघांना गोकुळ शिरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमी आणि संशयित विद्यार्थी एकाच शाळेत शिकतात. पवन पाटील दहावीच्या ‘ब’ तर संशयित ‘अ’ तुकडीत आहेत. मुख्य संशयिताला त्याचा मित्राने दोन ड्रेस दिले होते. यातून पवन व संशयित यांच्यात सोमवारी सकाळी भांडण झाले.
दहावीची पूर्व परीक्षा सुरू असून सोमवारी गणित भाग 2 चा पेपर दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी सुटला. त्यानंतर दोघेही घरी आले. तिथे पुन्हा दोघांत वाद होऊन हाणामारी सुरू झाली. त्यावेळी संशयिताने पवनवर चाकूने हल्ला केला. पवनला खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.पोलिस उपनिरीक्षक प्रणाली पोवार, स.पो.नि. प्रवीण पाटील, पोलिस उपाधीक्षक संकेत गोसावी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.