अंगभर सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या रुपामुळे परिचित असलेले ज्येष्ठ गायक संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत बातमी दिली आहे. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बप्पी लाहिरी हे मनोरंजन विश्व आणि चाहत्यांमध्ये ‘बप्पी दा’ या नावाने लोकप्रिय होते. बप्पी लाहिरी हे भारताला डिस्को संगीताची ओळख करुन देणाऱ्या गायकांपैकी एक मानले जातात. बप्पी लाहिरी यांनी 1970-80 च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली.
त्यांनी भारतीय चित्रपटात सिंथेसाईज डिस्को संगीताचा वापर लोकप्रिय केला आणि स्वतःच्याही काही रचना गायल्या. त्यांनी बंगाली चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. वारदात, डिस्को डान्सर, नमक हलाल, शराबी, डान्स डान्स, कमांडो, साहेब, गँग लीडर, सैलाब यासारख्या सिनेमांतील त्यांची गाणी प्रचंड गाजली होती. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी 3 चित्रपटात ‘भंकस’ नावाचे त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे ऐकायला मिळाले होते.