2008मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आज कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. तब्बल 13 वर्षे सुरु असलेला हा खटला अखेर निकाली काढण्यात आला आहे. या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अहमदाबाद सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए आर पटेल यांनी 49 दोषींपैकी 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर उर्वरीत 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गेल्या 13 वर्षांपासून विशेष न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी सुरु होती. अखेर हे प्रकरण निकाली काढण्यात आले आहे.
अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटातील 38 दोषींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या सर्व दोषींना शिक्षा सुनावण्यासोबतच पीडितांना भरपाई देण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहेत. या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तर बॉम्बस्फोटात गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार आणि किरकोळ जखमी झालेल्यांना 25 हजार रुपये देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.