ऐन शिवजयंतीचा मुहूर्त साधून शनिवारी नाशिकमध्ये केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. देशात केबल बनविण्याचा परवाना केवळ केबल कॉरपेशन ऑफ इंडिया यांना मिळालेला असून, या कंपनीचे देशाप्रतीचे योगदान अतिशय उल्लेखनीय आहे. आज शिवजयंतीच्या निमित्ताने नाशिक येथील केबल कॉर्पोरेशन इंडिया कंपनीचे उत्पादन प्रथम बाहेर वितरित होत असून, उद्योगांच्या विकासासाठी औद्योगिकदृष्ट्या सर्वोतोपरी मदत करण्यास सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी उद्योग तथा खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे. तर दर्जात्मक उत्पादनावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडियाने भर द्यावा. या कामातून जगभरात केबल कार्पोरेशन ऑफ इंडियाचे नावलौकिक निर्माण होईल, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सिन्नर माळेगाव एमआयडीसीतील केबल कार्पोरेशन ऑफ इंडियाचा उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर माळेगाव येथे कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीची पालकमंत्री छगन भुजबळ व उद्योगमंत्री देसाई यांनी पाहणी केली. यावेळी आमदार माणिकराव कोकाटे, उद्योजक जितूभाई ठक्कर, केबल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचेचेअरमन ॲण्ड मॅनेजिंग डायेरक्टर विजय कारिया, डायरेक्टर प्रथमेश कारिया, सोनल गरिबा, व्हाइस प्रेसिडन्ट धमेंद्र झा, असिस्टंट व्हाईस प्रेसिडन्ट राजाराम कासार, टेक्नीकल हेड माधव देशपांडे, प्राजेक्ट इंन्चार्ज पंकज सिंग आदी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, स्पर्धेच्या युगात यशस्वी होऊन स्थान टिकवायचे असेल, तर उत्पादकांनी दर्जात्मक उत्पादनावर अधिकाधिक भर द्यावा. महाराष्ट्र राज्य उद्योग क्षेत्रात कायमच आघाडीवर राहिले आहे. राज्यात मुंबई, पुणे व नाशिक ही शहरे उद्योगाच्या बाबतीत अग्रेसर आहेत. उद्योगासाठी जिल्ह्यात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कंपनी यशस्वी होण्यासाठी मालक व कामगार यांची भूमिका महत्वाची असून त्यांच्यात योग्य समन्वय असला पाहिजे. कंपनीच्या यशस्वीतेसाठी कामगारांची मोलाची साथ देणे आवश्यक आहे. त्याचसोबत कंपनी व्यवस्थापनाने सुद्धा कंपनीचा नफा वाढला तर त्याचा हिस्सा कामगारांना दिला पाहिजे.
केबल कॉरपोरेशन कंपनीची पाहणी करतेवेळी दर्जात्मक उत्पादनासाठी केलेली उत्तम व्यवस्था पाहावयास आज मिळाली. येणाऱ्या अडचणींवर हिमतीने मात करावी, असे सांगून केबल कॉरपोरेशन कंपनीचे नाव जगभरात उंचीवर जावो अशा शुभेच्छाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित कंपनीचे अधिकारी व कामगार यांना दिल्या आहेत. यावेळी सुरुवातीला उद्योगमंत्री सुभाष देसाई व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला माल्यार्पण करून अभिवादन केले.