महापालिकेच्या सेंट्रल नाका कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाविरुद्ध घरपट्टी रिवाइज न करण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरातील जिन्सी पोलीस ठाण्यात येथील वरिष्ठ लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी याविरोधात कारवाई करत सदर लिपिकाला ताब्यात घेतले. सोहेल पठाण फैज अहमद पठाण (52) असे या लिपिकाचे नाव आहे. औरंगाबाद महापालिकेतील मालमत्ता कर संकलन व निर्धारण विभागाचा कारभार वादात सापडला आहे. मागील चार महिन्यात या विभागातील दोन कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणात अडकले. त्यामुळे आता या विभागात ‘स्वच्छता’ झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.
याविषयी एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे आलमगीर भागात चार मजली घर आहे. त्या घरावरील मालमत्ता कराची पुनर्रचना न करण्यासाठी मनपाच्या सेंट्र नाका कार्यलायतील वरिष्ठ लिपिक सोहेल पठाण याने 16 डिसेंबर 2021 रोजी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने यासंबंधी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली तेव्हा पठाणला संशय आल्याने त्याने ही रक्कम स्वीकारली नाही. मात्र लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने एसीबीच्या पथकाने त्याला अटक केली. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.