तूर डाळीच्या घाऊक किंमतीत २.८७ टक्क्यांची घट झाली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने दिली आहे. यंदा तूर डाळीची घाऊक किंमत 9255.88 रूपये प्रति क्विंटल आहे. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात तूर डाळीची घाऊक किंमत 9529.79 प्रति क्विंटल होती. मे २०२१ मध्ये राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना अत्यावश्यक खाद्यपदार्थांच्या किंमतीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि अत्यावश्यक वस्तू कायदा,१९५५ अंतर्गत गिरण्या, आयातदार आणि व्यापाऱ्यांकडे असलेल्या डाळींच्या साठ्याची माहिती सार्वजनिक करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या.
डाळींची उपलब्धता सुधारण्यासाठी आणि किंमती स्थिर करण्यासाठी, सुरळीत आणि विना अडथळा आयात सुनिश्चित करण्यासाठी सरकारने १५ मे ते ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ‘मुक्त श्रेणी’ अंतर्गत तूर, उडीद आणि मूग आयातीला परवानगी दिली होती. तूर आणि उडदाच्या आयातीसंदर्भातील मुक्त व्यवस्था ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली. आयात धोरणामुळे तूर, उडीद आणि मूग यांच्या आयातीत गेल्या दोन वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.