ताजी बातमी ऑनलाईन टीम
पतीच्या निधनानंतर महिलांना विधवा म्हणून उर्वरित आयुष्य जगताना अनेकदा कुटुंब आणि समाज व्यवस्थेकडून मर्यादा येतात, पण म्हसवे (ता.भुदरगड) येथील अक्षय मोरे या अविवाहित तरूणाने सर्व रूढी परंपराना छेद देत विधवा भावजयीशी विवाह करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. अक्षयचा मोठा भाऊ मोतेशचा कोरोनाने बळी घेतला. भावाच्या मृत्यूने पोरक्या झालेल्या बाळासह भावजयीस पत्नी म्हणून स्वीकारले.
म्हसवे येथील मोतेश मोरे यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी स्वाती माने हिच्याशी झाला होता. दोघांचा सुखाचा संसार चालू होता त्यांना एक गोंडस मुलगाही झाला. त्यामुळे त्यांचा संसार आणखीन आनंददायी बनला होता या सुखी संसाराला दृष्ट लागली आणि मोतेश व त्यांचे संपूर्ण कुटुंबीय कोरोनाग्रस्त झाले. त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान मोतेशचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मोरे व माने कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला.
मोतेशच्या मृत्युनंतर मोरे व माने कुटुंबीयांनी एकत्र बसून तरुणपणीच विधवा झालेल्या स्वातीच्या उर्वरित आयुष्याचा विचार करत असताना मोतेशचा लहान भाऊ अक्षय या अविवाहित तरूणाने आपण स्वातीसह तिच्या बाळाला स्विकारण्यास तयार असल्याचे सांगितले.
हा अनोखा मंगल विवाह सोहळा रांगोळी (ता.हातकणंगले) येथे दोन्ही कुटुंबियांच्या व मित्र मंडळीच्या उपस्थित व बिद्री साखर कारखानाचे संचालक मधुकर देसाई व सरपंच सर्जेराव देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. विधवांचा सार्वत्रिक सन्मानाच्या दिशेने असणारा अक्षय व स्वाती यांचा हा पुर्नविवाह समाजासमोर आदर्श असा पुर्नविवाह ठरला आहे.