रेल्वे प्रवाशांसाठी खूप महत्वाची बातमी समोर आली आहे. सरकार रेल्वे प्रवाशांना सरसकट लोकल प्रवासाची परवानगी देण्याच्या विचारात आहे. याबाबत 25 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारच्या समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. सरसकट सर्वांनाच लोकल प्रवासाची परवानगी मिळाल्यास सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून विविध निर्बंध लावण्यात आले आहे. रेल्वे प्रवासाबाबत देखील नियम कठोर करण्यात आले होते. यात काही प्रमाणात आता शिशीलता आली आहे. मात्र अजूनही निर्बंध कायम आहेत. याचा सर्वाधिक फटका मुंबईमध्ये लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. अशात दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. त्यानुसार सरसकट सर्वांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकार यासाठी सकारात्मक असून याबाबत उद्या बैठक होणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने त्यासाठी तयारी सुरु केली आहे. सर्व तिकीट खिडक्या सुरु करण्यासोबत एटीव्हीएमची संख्या देखील वाढवली जात आहे. सध्या मध्य रेल्वेवर 178 एटीव्हीएम मशीन सुरु करण्यात आली आहे. यासह रेल्वेच्या मदतनीस यामार्फत सेवाही दिली जात आहे.
कोरोना महामारीच्या आधी मध्य आणि पश्चिम या दोन्ही लोकल मार्गावरून दररोज 75 लाख प्रवासी प्रवास करीत होते. कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाल्यामुळे नागरिकांना रेल्वे प्रवासाची बंदी घालण्यात आली होती. वेळोवेळी परिस्थितीनुसार निर्बंध कठोर तथा शिथिल देखील करण्यात आले. 15 ऑगस्टनंतर कोरोनाची दोन लस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या मध्य रेल्वेवर 35 लाख तर पश्चिम रेल्वेवर 28 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहे. अशातच सरकार रेल्वे प्रवाशांना सरसकट लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा विचार करत आहे. याबाबत उद्या होणाऱ्या राज्य सरकार समितीच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.