मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागणीसाठी खासदार छात्रपती संभाजीराजे आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत उपोषणाबाबत माहिती दिली होती. छत्रपती संभाजीराजे हे एकटे उपोषणास बसणार असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना पाठींबा मिळत आहे. 11.30 वाजता ते आझाद मैदानावर पोहचणार आहेत.
संभाजीराजे यांच्या या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे. अनेक ग्रामपंचायत, विविध संघटना, तालीम संस्थामार्फत ग्रामीण, शहर, तालुका आणि जिल्हा पातळीवर बैठका होत असून बहुजन समाजाकडून देखील या आंदोलनास पाठींबा मिळत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी खासदार संभजीराजे यांनी आमरण उपोषणाची हाक दिली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आधीच पत्र लिहून सूचाना दिली आहे. तसेच महाराष्ट्रभरातून आंदोलनासाठी येणाऱ्या मराठा बांधवांना अटकाव करू नये असे ट्विट त्यांनी आज केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र पोलीस आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना टॅग केले आहे.