सोलापूर-सांगली राष्ट्रीय महामार्गाचे 166 चे काम वेगाने सुरू झाले आहे. या 210 कि.मी.पैकी जवळपास 95 टक्के रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या चौपदरीकरणाच्या कामासाठी जवळपास चार हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्या 97 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच हा रस्ता आता प्रवाशांच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्राला थेट मराठवाड्याशी जोडणारा दुवा म्हणून हा रस्ता पुढे येणार आहे.
सांगली ते बोरगाव या 41 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पहिल्या टप्प्यात सुरू झाले होते. त्यासाठी 1002 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. दुसर्या टप्प्यात बोरगाव ते वाटंबरे हा 52 कि.मी.चा रस्ता मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी 1025 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. उर्वरित वाटंबरे ते मंगळवेढा या 45 कि.मी.च्या रस्त्यासाठी 957 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. चौथ्या टप्प्यात मंगळवेढा ते सोलापूर या 56 कि.मी.च्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी 1141 कोटी रुपयांचे काम मंजूर करण्यात आले आहे.
अनेक ठिकाणची कामे 97 टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामांपैकी काही ठिकाणी विजेची, तर काही ठिकाणी जोड रस्ता आणि पुलांची कामे प्रलंबित आहेत. येत्या दोन-तीन महिन्यांत ही कामे तातडी पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुहास चिटणीस यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर सर्वसामान्य लोकांसाठी हा रस्ता पूर्ण क्षमतेने खुला केला जाणार आहे.