गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने माणसाचे जगणे मुश्कील केले होते. अखेर कोरोनाचा वेग मंदावत चालला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला तसंच रुग्णसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली होती. पण आता कोरोनाची तिसरी लाट देखील ओसरत चालली आहे. कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा बऱ्यापैकी कमी झाला आहे. त्यामुळे सरकारकडून हळूहळू कोरोना काळात लावलेले निर्बंध शिथिल करण्याचे काम सुरु आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी घट लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील 14 जिल्ह्यातील कोरोना निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आजपासून मुंबई शहर आणि मुंबई उपनगरासह राज्यातील 14 जिल्हे पूर्णपणे अनलॉक झाला आहे.
सरकारने जे 14 जिल्हे अनलॉक केले आहेत त्यामध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश नाही. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर, वसई विरार इत्यादी महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांना राज्य सरकारच्या नव्या निर्णयाचा फायदा होणार नाही. पण, ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ठाणे, नाशिकसह उर्वरित 22 जिल्ह्यांमध्ये 50 टक्के क्षमतेचे निर्बंध कायम असतील. रेल्वे किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवासासाठी कोरोना प्रतिबंध लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवासाची मुभा कायम ठेवण्यात आली आहे.
पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 90 टक्क्यांपेक्षा अधिक
– दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 70 टक्क्यांपेक्षा अधिक
– पॉझिटिव्हीटी रेट हा 10 टक्क्यांपेक्षा कमी पाहिजे
– मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांसह 14 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून म्हणजेच 4 मार्च रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून राज्य सरकारचा नवा निर्णय लागू झाला आहे.
– सरकारच्या नव्या निर्णयानुसार, 14 जिल्ह्यांत नाट्यगृह, चित्रपटगृह, रेस्टॉरंट्स-बार, व्यापारी संकुलं, क्रीडा संकुलं, जलतरण तलाव, धार्मिक स्थळं, पर्यटनस्थळं आणि मनोरंजन पार्क्स 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार आहेत.
– इतर जिल्ह्यांमध्ये 50 टक्के क्षमतेची अट कायम ठेवण्यात आली आहे.
राज्यातील हे 14 जिल्हे अनलॉक –
– मुंबई शहर
– मुंबई उपनगर
– पुणे
– नागपूर
– भंडारा
– सिंधुदुर्ग
– रायगड
– वर्धा
– रत्नागिरी
– सातारा
– सांगली
– गोंदिया
– चंद्रपूर
– कोल्हापूर