प्रियकराच्या मागे लग्नासाठी तगादा लावणं प्रियसीला चांगलंच महागात पडलं. प्रियकराने प्रेयसीचा शिरच्छेद करुन जीव घेतला. उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. चित्रकूट जिल्ह्यात धडापासून मुंडकं वेगळं केलेल्या तरुणीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणाचा शोध घेताना अनेक धक्कादायक खुलासे झाले. 16 फेब्रुवारीला तरुणीचं लग्न होणार होतं, मात्र त्याच्या आठवडाभर आधीपासूनच ती बेपत्ता झाली होती.
मऊ पोलीस स्टेशन हद्दीतील हटवा गावात ही घटना घडली. सपनाचे 16 फेब्रुवारी रोजी लग्न होणार होते, परंतु ती 7 फेब्रुवारी रोजी घरातून बेपत्ता झाली, असा आरोप सपनाच्या कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत त्यांनी मऊ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. कुटुंबीयांनी विष्णू नावाच्या तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, त्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.
सपनाच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचे विष्णू नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू होते. अनेक वेळा त्यांनी दोघांना रंगेहाथ पकडले होते. मात्र बाबांनी ठरवलेल्या मुलासोबत लग्न करावे लागू नये, यासाठी ती वारंवार विष्णूला लग्न करण्याचा आग्रह धरत होती. मात्र या तगाद्याला कंटाळून प्रियकराने सपनाची निर्घृण हत्या केली.
सपना बेपत्ता होण्यामागे प्रियकराचा हात असल्याची शंका तिच्या कुटुंबीयांना आधीपासूनच होती, मात्र पोलिसांनी त्यांचं म्हणणं ऐकलं नाही. केवळ विष्णूला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून सोजून दिले. पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याचाही प्रयत्न केला.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवला आणि पीडित कुटुंबीयांना आश्वासन दिल्यानंतर महामार्गावरील चक्का जाम हटवण्यात आला. सध्या पोलिसांनी प्रत्येक बाजूने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. शेजारच्याच एका तरुणाने मुलीची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीय करत आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्यातून जे काही समोर येईल, त्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असं पोलीस अधीक्षक धवल जयस्वाल यांनी सांगितलं.